लोकमत न्यूज नेटवर्क
शिरुर : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे सरपंच-उपसरपंच निवडीदरम्यान जेसीबीवर चढत गुलाल उधळत जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपत ऊर्फ नाना संभाजी फराटे, सुरेश गुलाब शेलार, प्रदीप दादा कंद, ज्ञानदेव उर्फ काका जिजाबा खळदकर, सरपंच सचिन बंडू शेलार, मोहन चव्हाण, भाऊ यादव, पोपट पंढरीनाथ शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी योगेश आनंदा गुंड यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि२४) दुपारी ३.२० वाजता वडगाव रासाई ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच या पदाची निवडणूक होती. या निवडणुकीत सरपंचपदी सचिन बंडू शेलार यांची निवड झाली. यानंतर ग्रामपंचायतीजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात प्रदीप कंद हे तेथे आले. यानंतर ज्ञानदेव ऊर्फ काका जिजाबा खळदकर, सचिन बंड शेलार, मोहन चव्हाण, वीरेंद्र शेलार, भाऊ यादव यांनी जेसीबीच्या बकेटमध्ये तसेच जेसीबी ५० ते ६० जणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीचे आदेश तसेच विनापरवानगी मिरवणूक काढून बेकायदा गर्दी जमवून घोषणाबाजी केली. यामुळे शिरूर पोलीस ठाण्यात वरील सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहेत.
- जेसीबीच्या बकेटमध्ये कार्यकर्त्यांसह असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद.