चाकण : कोरोना उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक बिल वसूल केल्याप्रकरणी चाकण येथील क्रिटीकेअर या खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ ते ९ सप्टेंबर २०२० दरम्यान हा प्रकार घडल्याचे पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा गणपत ढवळे (वय ५८) यांनी शनिवारी (दि. २९) चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. राजेश घाटकर, डॉ. स्मिता घाटकर, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. सीमा गवळी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्ण विजय लक्ष्मण पोखरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर हॉस्पिटलने उपचाराचे बिल शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक वसूल केले. त्याबाबत आरोग्य प्रशासनाने संबंधित रुग्णालयाला पैसे परत करण्याबाबत सूचना दिल्या. मात्र, त्याबाबत संबंधित खासगी रुग्णालयाने काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिसांनी या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.
रुग्णालय प्रशासन म्हणते...:
चाकण क्रिटीकेअर रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, संबंधित रुग्णाचे वैद्यकीय बिल कमी करावे, पैसे परत करावे अशी कुठलीही सूचना संबधित प्रशासनाकडून करण्यातच आली नव्हती. सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली असल्याचे संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
फोटो : चाकण ( ता. खेड ) येथील क्रिटीकेअर रुग्णालय.