पिंपरी : माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, पगाराचे पैसे दे अशी मागणी करून पोलीस कर्मचारी पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यानंतर तीन वेळा तोंडी तलाक देणाऱ्या पतीवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ९ एप्रिल २०१७ ते २० मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.
पीडित विवाहितेने याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २०) फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादीचा पती आझम पापाभाई पटेल (वय ३५), सासू बानू पापाभाई पटेल (वय ६०), दीर फरीयाज पापाभाई पटेल (वय ३२), नणंद मुमताज पापाभाई पटेल (वय ३४, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी महिलेचे आरोपी आझम पटेल याच्याशी २०१७ मध्ये ९ एप्रिल रोजी लग्न झाले. त्याच्या तीन दिवसानंतर आरोपींनी फिर्यादीचा छळ सुरू केला. माहेरून पाच लाख रुपये आण, आम्हाला तुझ्या पगाराचे पैसे दे, असे म्हणून आरोपींनी वारंवार पैसे व दागिने यांची मागणी केली. तसेच फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तुला स्वयंपाक येत नाही, आईबापाने काही शिकवले नाही, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला काहीवेळा जेवायला न देता उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ करून जाच केला. छळाबाबत फिर्यादीने तिच्या माहेरच्यांना सांगितले. त्यावेळी आरोपीला समजावून सांगत असताना आरोपी आझम पटेल याने तीन वेळा तलाक असे उच्चारून फिर्यादीला तोंडी तलाक दिला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस असलेल्या महिलेने याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रवी भवारी पुढील तपास करत आहेत.