लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन तीन वर्षांत १२ लाख ५३ हजार ५०० रुपयांची खंडणी घेतली. एवढी मोठी रक्कम उकळल्यानंतर पुन्हा १ लाख २० हजार रुपयांची खंडणी मागून १ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे धनादेश जबरदस्तीने लिहून घेतले. त्यामुळे दोन तरुणांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत आत्माराम शेडगे (वय ३०) व नीलेश बाळासाहेब भेगडे (वय ३५,दोघेही रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत. नीलेश भेगडे हे राष्ट्रवादीतील एका नेत्याचे पुतणे आहेत. नवनाथ धोंडिबा म्हसे (वय ३४, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये आरोपी श्रीकांत शेडगे व नीलेश भेगडे यांनी नवनाथ म्हसे या फिर्यादीला कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी दिली. २७ जून २०१४ ते २८ जून २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत जबरदस्तीने प्रतिमहा ३० हजार रुपये खंडणीचा हप्ता उकळला. तीन वर्षात १२ लाख ५३ हजार ५०० रुपयांची खंडणी उकळल्यानंतर पुन्हा १ लाख २० हजार रुपयांची खंडणी मागीतली. आरोपींकडून घेतलेली मोटार त्यांना परत केली असताना, आरोपी त्यांच्याकडे पैसे मागू लागले. जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी १ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे सिंडिकेट बँक तळेगाव दाभाडे शाखेचे धनादेश जबरदस्तीने लिहून घेतले. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी म्हसे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नीलेश भेगडे यांना पोलीस कोठडीयाप्रकरणी श्रीकांत शेडगे यांना पोलीस कोठडीही सुनावली होती. नंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली. यातील दुसरा आरोपी नीलेश भेगडे याला पोलिसांनी शनिवारी १५जुलैला अटक करून वडगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
‘राष्ट्रवादी’ नेत्यांच्या पुतण्यावर गुन्हा
By admin | Published: July 16, 2017 3:46 AM