पुणे : आळंदी येथे पालखी प्रस्थानावेळी पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराबद्दल माफी न मागितल्यास पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा होऊ देणार नाही, असा इशारा देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तुषार रमेश दामगुडे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे यांनी हेतुपुरस्सर चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे दामगुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीमार केल्याच्या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडचे संघटक शिंदे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला. पोलिसांनी केलेला लाठीमार सरकार पुरस्कृत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी समाजाची माफी मागावी. माफी न मागितल्यास पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.वारकऱ्यांमध्ये पोलिस आणि प्रशासनाविरुद्ध द्वेष निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचिवण्याचे कृत्य शिंदे यांनी केल्याचे दामगुडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक शेडगे तपास करत आहेत.