दौंड : लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दोन निवडणूक प्रशिक्षण घेण्यात आले होते. दरम्यान, दोन्ही प्रशिक्षण शिबिराला सुमारे ९४ शासकीय अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर होते. तेव्हा ९४ गैरहजर शासकीय कर्मचाºयांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिली.
दौंड येथील प्रशासकीय इमारतीत कर्मचाºयांसाठी निवडणूक प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसीलदार राजेंद्र जाधव उपस्थित होते. यावेळी निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, महसूल प्रशासकीय इमारतीत स्वतंत्र ‘आचारसंहिता कक्ष’ उभारण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना निवडणुकीसाठी ज्या काही परवानग्या लागणार आहेत, त्याकरिता ‘एक खिडकी कक्ष’ सुरू झाला आहे. याअंतर्गत वाहन परवाना, तात्पुरता पक्ष कार्यालय उभारणे, कोपरा सभा, प्रचार, लाऊड स्पीकर, रॅली, मिरवणूक, हेलिपॅड बांधकाम, हेलिकॉफ्टर लँडिंग परवाना याबाबत परवानग्या मिळणार आहेत. याचबरोबर ‘मीडिया मॉनिटरिंग सेल’ सुरू करण्यात आला असून या अंतर्गत प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होणाºया मजकुरासंदर्भात तपासणी केली जाणार आहे, तर दुसरीकडे मतदारांची संख्या वाढविण्यासाठी मतदारजागृती कक्ष सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत तालुक्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘मतदार जागृती अभियान ’ राबविण्यात सुरू करण्यात आले आहे.दौंडला २ लाख ९४ हजार ९३३ मतदानलोकसभेसाठी दौंड तालुक्यात २ लाख ९४ हजार ९३३ मतदान आहे. पैकी पुरुष मतदान १ लाख ५४ हजार ८२६ आहे. महिला मतदान १ लाख ४० हजार १०१ आहे. दरम्यान, तृतीयपंथीय सहा मतदान असल्याने तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी सांगितले.