लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : कर्करुग्णास बरा करतो, असे सांगून बारामतीतील एकाची दोन लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसलेंसह (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकांत खरात (रा. साठेनगर, कसबा बारामती, ता. बारामती, जि. पुणे) यांनी या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार खरात यांच्या वडिलांना ‘थायरॉइड कॅन्सर’ हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहर मामा भोसले या भोंदूबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजुबावी (ता. बारामती) मठामध्ये गेले. त्यांनी बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडिलांचा कर्करोग बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. तसेच विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांच्याकडून एकूण दोन लाख ५१ हजार ५०० रुपये त्यांचे व त्यांचे वडिलांच्या जिवाचे बरे-वाईट होईल, अशी भीती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत खरात यांच्या तक्रारीवरून आरोपी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा, ओंकार शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा व औषधे व चमत्कारी उपाय (आक्षेपार्ह जाहिरात) अधिनियमान्वये बारामती तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून मनोहर मामा भोसले व त्याच्या साथीदारांनी कोणाची फसवणूक वा भीती घालून पैसे देण्यास भाग पाडले असेल त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.