शनिवार (दि. १८) सकाळी ६ वाजता आलिशान चारचाकी गाडी भरधाव वेगाने आली, जवळ असलेल्या छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या झाडून चिंकारा हरणाची शिकार करत त्यांना गाडीत घालून शिकाऱ्यांनी पलायन केले. ही माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना आणि वनविभागाला दिली. नागरिकांना बंदुकीतून गोळी झाडण्याचा आवाज आला. त्यांनी पाहिले असता हरणाला गोळी लागल्याचे दिसले. तीन शिकाऱ्यांनी गाडीतून उतरून हरणास गाडीत घातले. हा सर्व प्रकार येथील एका शेतातील कामगाराने पाहिला.
या भागात चिंकारा हरणांची संख्या मोठी होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून संख्या कमी होत आहे. याप्रकरणाचा छडा लावून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इंदापूर तालुका चिंकारा बचाव अभियानाचे प्रमुख भजनदास पवार यांनी केली आहे. आरोपींचा छ्डा न लागल्यास आंदोलन करणार असल्याचे नेचर क्लबचे ॲड सचिन राऊत यांनी सांगितले. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. येथील एका शेतकऱ्याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात वाहन दिसत आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनास्थळी कुठलाही पुरावा मिळाला नाही. यामुळे त्या काळात या परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईलवरून वनविभाग आणि पोलीस आरोपींचा शोध घेणार असल्याचे राहुल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
चौकट
पर्यटकांसाठी अभयारण्य बंद करणार
राज्यातील वनविभागाचा पथदर्शी प्रकल्प असलेल्या इंदापूर तालुक्यातील लोक अभयवन कडबनवाडी येथे चिंकारा हरणांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. मात्र, त्यांच्यामार्फत या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याने हे अभयारण्य काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली.
फोटो :- कडबनवाडीत चिंकारा हरणांची शिकार झाली त्या स्थळाचा पंचनामा करताना वनाधिकारी.