वाकड : आयटी अभियंत्यांना हिंजवडीतील वाहतूककोंडी समस्येपुढे मंगळवारी हतबल होण्याची वेळ आली. वाकड, काळाखडक येथपासून ते हिंजवडी फेज तीनपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तासांनी वाहतूककोंडीतून त्यांची सुटका झाली. ज्या वाहनांमुळे ही समस्या उद्भवली, त्या दोन वाहनचालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आयटी पार्क हिंजवडीमधील कंपन्यांमध्ये जाण्याच्या वेळेत वाकड पुलाखाली कंटेनर बंद पडला. फेज तीनला पीएमपी व खासगी बस बंद पडली. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या सर्वच मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुचाकी, चारचाकी वाहने पुढे सरकण्यास जागा नसल्याने अनेक जण रस्त्यात अडकले. या प्रकरणी दोन वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. खासगी कंपनीची बस (क्रमांक एमएच ४३, एच ८५९४) ऐन वर्दळीच्या रस्त्यात बंद पडल्याने हुवन्ना भीम बनसोडे (वय ३५, रा. जांभूळकर वस्ती, हिंजवडी) या वाहनचालकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला आहे. तसेच मुक्ताजी विठ्ठल लोंढे (वय ३०, रा. नेताजीनगर, वानवडी, वाहन क्रमांक एमएच १४, डीएम ८०८५) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावरील भूमकर वस्ती-काळाखडक येथील पुलाखाली एक कंटेनर बंद पडला आणि हिंजवडी फेज तीन येथील विप्रो सर्कल येथे एक मिनी बसमध्ये बिघाड झाला, त्याचबरोबर एचडीएफसी बँकेसमोर पीएमपीएलची बस बंद पडली. ही वाहने ऐन वर्दळीच्या ठिकाणी एकदाच वेळी बंद पडल्याने आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली. काही वेळातच लांबच-लांब रांगा लागल्या. (वार्ताहर)
वाहतूककोंडी करणाऱ्यांवर गुन्हे
By admin | Published: August 10, 2016 1:07 AM