पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.भावना विजय जैन (वय ३५, रा. आशा पार्क सोसायटी, मार्केटयार्ड) असे या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी जाहिद जलील खान (वय ५२, रा. अलअमिन सोसायटी, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन आणि खान यांचा परिचय आहे. तीन वर्षांपूर्वी जैनने खान यांना गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. टीसीएसमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे तिने सांगितले होते. त्यानंतर खान यांनी १४ लाख ५ हजार रुपये गुंतविण्यास दिले़ मात्र, जैन यांनी कंपनीत भरणा केलाच नाही़ खान यांनी तिच्याकडे पैसे परत मागितले. तिने त्यांना धनादेशाद्वारे पैसे दिले. मात्र, खात्यात पैसे नसल्याने धनादेश वटला नाही. खान यांनी विचारणा केली असता तिने त्यांना पुन्हा धमकावले. पोलिसांकडे तक्रार करते, अशी धमकी दिली. त्यानंतर खान यांनी पोलिसांकडे तक्रारअर्ज तसेच गुंतवणुकीसाठी दिलेली कागदपत्रे सादर केली. पोलिसांकडून या प्रकरणाची शहानिशा करण्यात आली. जैन विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. देवधर तपास करत आहेत.