बारामती : शहर व तालुक्यामध्ये गुन्हेगारीचा टक्का वाढू लागला आहे. मागील काही दिवसांमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाने बारामतीतीतल ३५ सराईत गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाईला मंजुरी दिली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पायबंद घालण्यास मदत होणार आहे. परंतु, बारामती शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान आता पोलीस प्रशासनासमोर असणार आहे.
बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील खासगी सावकारकी, डोर्लेवाडीमध्ये छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने केलेली आत्महत्या तसेच काही दिवसांपूर्वी कृष्णा जाधव हत्याप्रकरणाने बारामती परिसर ढवळून निघाला होता. कृष्णा जाधव हत्याप्रकरण दिवसाढवळ्या घडल्याने बारामती शहरात पुन्हा गँगवार सुरू होतेय की काय या भीतीने नागरिक हादरून गेले होते. या हत्याप्रकरणामध्ये अल्पवयीन मुलांच्या असणाऱ्या समावेशाने गुन्हेगारीचे नवीनच स्वरूप समोर आले होते. बारामती एमआयडीसी परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. या भागातील वाढत्या औद्योगिकीरणामुळे बारामतीसह शेजारील तालुक्यांतून दररोज हजारो कामगार येत असतात. या कामगारांना लक्ष्य करून लुटणाºया टोळ्यादेखील सक्रिय झाल्या आहेत.
या भागात फसवणुकीचे प्रकार, जबरी चोरी, मारहाण, वाटमारी आदी प्रकारांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर शहरात अवैध व्यवसायांचे प्रमाण वाढले आहे. अवैध दारू, मटका, जुगार, रसायनमिश्रित ताडी, गुटखाविक्री, अवैध वाहतूक, वेश्या व्यवसाय बोकाळले आहेत. यातूनच गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात अल्पवयीन मुलांच्याही टोळ्या सक्रिय होऊ लागल्याने पालक, पोलिसांसमोर ही ‘कोवळी’ गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान राहणार आहे. बारामती बसस्थानक, एमआयडीसी, सांस्कृतिक केंद्र परिसर, जनावरे बाजार परिसर आदी ठिकाणी वाटमारी, प्रवाशांची लूट, जबरी चोरी आदी प्रकार सर्रास घडत आहेत.बारामती शहराच्या लोकसंख्येचा विचार करता शहर पोलीस ठाण्याला अपुरे पोलीस बळ आहे. शहर पोलीस ठाण्यात १२५ पोलीस कर्मचाºयांच्या जागा आहेत. यातील ८२ कर्मचारी कार्यरत आहेत. आणखी २१ पोलीस कर्मचाºयांची गरज आहे. तर तालुक्यात ६० पैकी ५६ जागांवर कर्मचारी कार्यरत आहेत. तरसेच गरजेच्या वेळी मोठ्या बंदोबस्तासाठी आरसीएफची दोन पथके अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहेत.