पुणेः शिवाजी रस्त्यालगतच्या दोन इमारतीवर छापा टाकून हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखा युनिट-४ व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यामध्ये दोन कोटी पेक्षा अधिक रोकड जप्त केली असून, रात्री उशीरापर्यंत त्याची मोजणी सुरू होती. राज्यात बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थ गुटखाच्या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेली ही रोकड असल्याचे समजते. यात हवाल्याच्या व्यवहारातील बडे मासे गळाला लागली असल्याची माहिती कळते आहे.
याप्रकरणी, पोलिसांनी आठ ते नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबात रात्री उशीरापर्यंत फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे हे रॅकेट परिमंडळ पोलिस उपायुक्त १ फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चालवले जात होते.
पोलिस उपायुक्त प्रियंका नरनवरे, युनिट चार चे पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल आणि सहाय्यक निरीक्षक अभिजित चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. येथील मंत्री किशोर आर्केड व गणेश कृपा बिल्डींग शनिवारपेठ या दोन इमारतीवर छापा टाकून आठ ते नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना माहिती मिळाल्यावर कारवाईचे आदेश दिले होते. उपायुक्त नरनवरे यांनी सांगितले की, ही पुणे शहर गुन्हे शाखा आणि परिमंडळ एकच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. आम्हाला अशी माहिती मिळाली की, या रॅकेटमागील काही माणसे बेकायदेशीरपणे रोख रकमेचा संग्रह करत होती. ही रोकड ते एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी बेकायदापणे पोहचवत होते. हवाला रॅकेट गुटखाच्या बेकायदेशीर पुरवठादारांशी जोडला गेला होता. आम्ही एकाच वेळी चार कार्यालयांवर छापे टाकले आणि नऊ जणांना ताब्यात घेतले.
दरम्यान, गुटख्याच्या अवैध व्यापारातून रोख रकमेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. हा पैसा पुण्याहून हवाला रॅकेटमार्गे अन्य शहरात हलविण्यात येत होता. रॅकेटची यंत्रणा संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात पसरली आहे. रोकड पैशाचा माग कुठून निघाला आहे याची पोलिस चौकशी करीत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी बऱ्याच लोकांचा समावेश असण्याचा पोलिसांचा अंदाज आहे.