पुणे : उशिरापर्यंत सुरु असलेल्या पबवर गुन्हे शाखेने छापे टाकून रविवारी पहाटे ६ पबवर कारवाई केले. बेकादेशीरपणे दारू विक्री होत असल्याचे आढळून आल्यावर त्यातील दोन पबमधून साडे चार लाख रुपयांच्या १९६ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्लेबॉय हा पब पहाटे पर्यंत सुरु होता. प्रत्यक्षात या पबचे रजिस्टर नाव वेगळे आहे. तेथे मोठमोठ्या आवाजात म्युझिक सुरु होते. डान्स फ्लोअरवर अनेक तरुण तरुणी नृत्य करीत होते. तसेच तेथे बेकायदेशीरपणे दारूची विक्री केली जात होती. पोलिसांनी तेथून साडेतीन लाख रुपयांच्या १४७ दारुच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच बेकायदेशीरपणे दारु विक्री केल्याबद्दल पबचे ३ मालक, २ मॅनेजर आणि ३ वेटरवर गुन्हा दाखल केला. तसेच डीजेवर कारवाई केली आहे.
लॉडर्स ऑफ ड्रिक्स या येरवड्यातील पबवर पोलिसांनी कारवाई करुन तेथून १ लाख १ हजार ६३५ रुपयांच्या ४९ दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पबचा मालक, १ मॅनेजर आणि ३ वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नियमभंग करणाऱ्या बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २बीएचके पब, केनो पब, मिलर पब, बोटॅनिके पब अशा चार पबवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सकट, विशाल, माऊली पवार यांच्या पथकाने केली आहे.