केडगाव (पुणे): पारगाव (तालुका- दौंड) येथील रेणुकादेवी दूध संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज बाहेरील गुंडांनी हैदोस घालत कोयत्याच्या साहाय्याने वार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भीमा पाटस कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे, रेणुकादेवी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांचे चिरंजीव रामकृष्ण ताकवणे, सचिन ताकवणे किरकोळ जखमी झाले आहेत.
आज झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी पोपटराव ताकवणे यांची बिनविरोध निवड झाली. दुपारी १ वाजता रेणुकादेवी संस्थेच्या कार्यालत निर्धारित वेळेमध्ये निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी एका गटाने संचालक मंडळ गेली तीन दिवसांपासून सहलीसाठी नेले होते. सव्वा वाजताच्या दरम्यान सदर संचालक मंडळ संस्थेच्या कार्यालयात मतदानासाठी येत असताना एका फॉर्च्युनर गाडी मध्ये बसलेल्या ४ गुंडांनी सदर संचालक मंडळाची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. फॉर्च्यूनर गाडीला गुंगारा देत संचालक मंडळ संस्थेच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी गावातील युवक रामकृष्ण ताकवणे याच्यावरती एकाने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
ताकवणे यांना वाचवण्यासाठी भीमा पाटसचे संचालक तुकाराम ताकवणे यांनी हात घातल्याने त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. दुसरा वार सचिन ताकवणे यांच्यावरती केला. यावेळी ग्रामस्थ जमल्याने गुंडांनी वेळीच पलायन केले. अध्यक्ष निवडीनंतर संस्थेच्या कार्यालयांमध्ये निषेध सभा घेण्यात आली.
यावेळी संस्थापक चेअरमन पोपटराव ताकवणे, सयाजी ताकवणे, अरुण बोत्रे, सर्जेराव जेधे, मच्छिंद्र ताकवणे, सोमनाथ ताकवणे यांनी सदर घटनेचा निषेध केला. यावेळी सुभाष बोत्रे, संभाजी ताकवणे, दत्तात्रय ताकवणे, मधुकर ताकवणे, रवी ताकवणे, किसन जगदाळे, स्वामी शेळके आदी उपस्थित होते.