पुणे : दुर्दैवाने माझ्या मेव्हण्याने तक्रार दिली आणि माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजकीय सुडबुद्धीतून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यामागे कोणाकोणाचा सहभाग आहे, याची शहानिशा करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांनी सांगितले. काकडे यांचे मेव्हणे युवराज ढमाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनीसंजय काकडे दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ढमाले यांनी आपल्याला जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याविषयी बोलताना संजय काकडे यांनी सांगितले की, आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकारांकडून समजली. दुदैवाने माझ्याच मेव्हण्याने फिर्याद दिली आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या घरात मी धमकी दिली असे त्यांचे म्हणणे आहे. हे राजकीय षडयंत्र असून मी संबंधितांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. वास्तविक दोन वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी युवराज ढमाले पुष्पगुच्छ घेऊन आले असताना भेट झालेली आहे. याव्यतिरिक्त आजपर्यंत गेल्या दोन वर्षात त्यांच्याबरोबर माझे बोलणे झालेले नाही. ज्यांनी तक्रार दिली, त्यांनी घेतली त्यांचे फोन चेक करा. जोपर्यंत ही एफआयआर रद्द होत नाही, तोपर्यंत अगदी दिल्लीपर्यंत जाऊन आपण याची शहानिशा करणार आहोत. कोर्टाच्या माध्यमातून याची चौकशी व्हावी, माझ्या वकिलांनीही सांगितले की, तुमचे म्हणणे न मांडता पोलीस एफआयआर दाखल करतात. राज्य घटनेनुसार कोणाविरुद्ध तक्रार आली तर त्याची चौकशी करावी. त्यानंतर त्यात तथ्य आढळल्यावर गुन्हा दाखल करावा. आतापर्यंत आपल्याला पोलिसांकडून काहीही कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे एका माजी खासदाराला त्याचे म्हणणे मांडू न देता, पोलीस गुन्हा दाखल करतात. हे चुकीचे आहे. राजकीय सुडबुद्धी, आर्थिक चणचण आणि माझी झालेली राजकीय प्रगती यामुळे कोणीतरी हाताशी धरुन हा गुन्हा दाखल केला आहे. त्यात जे जे सहभागी आहे, त्यांना शिक्षा मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही, असे काकडे यांनी सांगितले.
राजकीय सुडबुद्धीतून आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल,अब्रुनुकसानीचा दावा करणार : संजय काकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 1:16 PM
संजय काकडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची युवराज ढमाले यांची पोलिस ठाण्यात तक्रार
ठळक मुद्देचतु:श्रृंगी पोलिसांनी संजय काकडे दाम्पत्यांवर गुन्हा दाखल