पुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अनुदानीत चारा छावण्यांमध्ये जनावरे घेण्यास संस्थांकडून नकार दिला जात असल्याची तक्रार शेतक-यांकडून प्राप्त झाल्यास संबंधित संस्थेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी दिले.त्याचप्रमाणे प्रत्येक चारा छावणीच्या बाहेर ‘शासन अनुदानित चारा छावणी’असे नाम फलक लावावेत, अशी सुचनाही शिवतारे यांनी केली. पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्व 2019 नियोजन बैठकीत शिवतारे बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, आमदार भिमराव तापकीर, बाबुराव पाचर्णे, शरद सोनवणे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे,शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहगडे, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले व पंचायत समिती सदस्या निर्मला काळोखे, सुवणा शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.जी पलघडमल, कृषी अधिकारी सुनील खैरनार, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर आदी उपस्थित होते.शिरूरमधील एका साखर कारखान्यात सुरू असलेल्या चारा छावणीत ठराविक शेतक-यांच्या जनावरांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार बाबुराव पाचर्णे यांनी बैठकीत केली. त्यावर संबंधित छावणी शासकीय असल्यास त्या ठिकाणी मोठा फलक लावावा,तसेच यापुढे कोणी चारा छावण्यात जनावरांना प्रवेश देताना दुजाभाव करत असल्याचे आढळून आले. तसेच शेतक-यांकडून त्याबाबत लेखी तक्रार प्राप्त झाली तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा,अशा सुचना शिवतारे यांनी दिल्या. त्याचप्रमाणे साताऱ्यात शेळ्या मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू झाली आहे.पुण्यातही मागणी असल्यास शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करावी,असे शिवतारे म्हणाले.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात नऊ चारा छावण्यांना मंजूरी दिली असून त्यातील काही छावण्या बारामती,शिरूर व पुरंदर तालुक्यात सुरू झाल्याचे सांगितले. तसेच वेळोवेळी चारा छावण्यांचा आढावा घेतला जाईल,असे स्पष्ट केले. बैठकीमध्ये राज्यमंत्री शिवतारे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगाम 2019 साठी आवश्यक बियाणे व रासायनिक खतांचे नियोजन, कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण, खरीप रब्बी सन 2018-19 पीक कर्ज वाटपाबाबतची माहिती घेतली. तसेच टंचाई नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आदी योजनांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक सूचना केल्या.---------------------------
चारा छावणीत जनावरांना प्रवेश नाकारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : विजय शिवतारे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 8:00 PM
शिरूरमधील एका साखर कारखान्यात सुरू असलेल्या चारा छावणीत ठराविक शेतक-यांच्या जनावरांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार केली.
ठळक मुद्देप्रत्येक चारा छावणीच्या बाहेर ‘शासन अनुदानित चारा छावणी’असे नाम फलक लावावेत..