पुणे : पेरणी केल्यानंतर सोयाबीनच्या बियाणांची उगवणी न झाल्याने संबंधित बियाणे उत्पादक कंपनीच्या मॅनेजरवर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दगडु नानाभाऊ अंभोरे (रा. शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल केलेल्या कृषिधन कंपनीच्या मॅनेजरचे नाव आहे.
याप्रकरणी जुन्नर तालुका कृषि अधिकारी सतीश कारभारी शिरसाठ (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूकीसह बियाणे कायदा ६ बी, ७ बी सह बियाणे नियम कलम २३ ए/२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ जून ते १ जुलै २०२० दरम्यान घडला होता.
जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामामध्ये कृषिधन प्रा. लि. जालना या कंपनीने सोयाबीन बियाणे (के एस एल ४४१) वाणीची मोठ्या प्रमाणावर विक्री केली होती. मात्र, या बियाणांची उगवणी झाली नाही. त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले. जुन्नर तालुक्यातील कोंबरवाडी, आर्वी, पिंपळगाव, गोळेगाव, बेल्हे या गावातील शिवाजी आहेर, रोहिदास शिंदे, पांडुरंग दाते, अंजनाबाई शिंदे यांच्यासह ३२ शेतकर्यांनी तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रारी केल्या होता. त्याची चौकशी कृषि अधिकारी शिरसाठ यांनी केली. कंपनीकडून विकण्यात आलेली सोयाबीन बियाणे ही १५ ते ३० टक्के निकृष्ट असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर फसवणूक आणि बियाणे कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरसाठ यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कृषिधन कंपनीचे मुख्य कार्यालय सेनापती बापट रोडवरील साई कॅपिटल येथे असल्याने हा गुन्हा आळेफाटा पोलिसांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे वर्ग केला आहे.