बारामती : कोरोनाच्या संकटात देखील सर्वसामान्यांची गरज ओळखुन आपले उखळ पांढरे करणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी एमआयडीसी परिसरातील एका मॉलच्या मालकावर हँडवॉशची जादा दराने विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जळोचीचे गाव कामगार तलाठी सदाशिव चोरमले यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. १) रोजी ही घटना घडली. या मॉलमध्ये हॅण्डवॉशची निर्धारित किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री होत असल्याची तक्रार एका ग्राहकाने तहसील कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार तहसीलदारांनी चोरमले यांच्यासह काटेवाडीचे तलाठी महेश मेटे यांना यांसंबंधी कारवाईचे आदेश दिले होते. या दोघांनी मॉलमध्ये ग्राहक म्हणून जात दोन हॅण्डवॉश खरेदी केले. त्याचे रितसर बिल घेण्यात आले. निर्धारित किमतीपेक्षा ते जादा असल्याचे दिसुन आले. याबाबत मालक वैभव गांधी यांच्याकडे त्यांनी चढ्या भावाबाबत तसेच रिफिलवर केलेल्या खाडाखोडीबाबत विचारणा केली .त्यावर गांधी यांनी वरूनच तसा माल आला असल्याचे उत्तर दिले. मूळ १८९ रुपयांच्या किमतीऐवजी २८० रुपयांना येथे हॅण्डवॉश विकला जात होता. त्यानुसार हॅण्डवॉशची चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी येथील एमआयडीसीतील सिटी सेंट्रल मॉलचे मालक वैभव राजकुमार गांधी यांच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात फसवणूक तसेच कलम १८८, राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ व साथीच्या रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.——————————————————..कोरोनाच्या परिस्थितीत कायद्याचा धाक कायम दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी ' सिंघम ' स्टाईलने लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईस सुरवात केली आहे.त्यामुळे काळा बाजार करणाऱ्यां चे धाबे दणाणले आहेत.लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना कैदेची शिक्षा,कोरोनाग्रस्त रुग्णाची ओळख जाहिर करणाऱ्यांसह व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनवर गुन्हा, नियमांचा भंग करणाऱ्या दुकानदारांवर देखील पोलीसांनी कारवाई केली आहे.त्यामुळे बारामती शहरात पोलीसांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीमध्ये कायद्याचा धाक कायम ठेवल्याचे चित्र आहे. ———————————————————
बारामतीत जादा दराने हँडवॉश विक्री करणाऱ्या एका मॉलच्या मालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 5:06 PM
या मॉलमध्ये हॅण्डवॉशची निर्धारित किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री होत असल्याची एका ग्राहकाची तक्रार
ठळक मुद्दे..कोरोनाच्या परिस्थितीत कायद्याचा धाक कायम