इंदापूर : शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून ग्रामसेविकेच्या तक्रारीवरून बाभुळगाव ग्रामपंचायत सदस्याच्या पतीवर तर त्याने दिलेल्या तक्रारीवरून त्या ग्रामसेविकेसह एक जणावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून इंदापूर पोलीस ठाण्यात आज (दि. ४) परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.नागनाथ भिवा गुरगुडे (रा. बाभुळगाव) स्वाती मोहनलाल लोंढे (रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर), लक्ष्मण चव्हाण (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी आरोपी व फिर्यादींची नावे आहेत. ठाणे अंमलदार अजीज शेख यांनी सांगितले, की फिर्यादी या बाभुळगाव ग्रामपंचायतीत ग्रामसेविका म्हणून काम करतात. आज दुपारी त्या ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असताना, ग्रामपंचायत सदस्या उमा गुरगुडे यांचे पती नागनाथ गुरगुडे हे ग्रामपंचायत कार्यालयात आले. ‘तू काय गावाची मालकीण आहेस का, आधी ग्रामपंचायतीच्या नावे असलेली बल्बांची उधारी दे. नंतर काम कर,’ असे म्हणत ग्रामपंचायत कार्यालयातील तीन खोल्यांपैकी एका खोलीला परस्पर कुलूप लावून त्यांनी चावी स्वत:कडे ठेवली. ग्रामपंचायतीचे नमुना क्र. ८, ९ व १० चे दप्तर फिर्यादीकडून हिसकावून घेऊन तेथून निघून गेले, अशा आशयाच्या फिर्यादीवरून नवनाथ गुरगुडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
ग्रामसेविका, ग्रामपंचायत सदस्याच्या पतीवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:27 AM