कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना लुटणाऱ्या भुरट्या चोरांना आळा घालण्याची मागणी विविध कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद घुगे व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये समन्वय बैठक पार पडली. यामध्ये प्रामुख्याने याबाबत चर्चा करण्यात आली.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांवर उपाययोजना करण्याच्या हेतूने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्राशी निगडित असणाऱ्या व गुन्हेगारी क्षेत्राला जागा मिळवून देणाऱ्या भंगार, केमिकल विक्री, बांधकामे अशा विविध कामांत येणाऱ्या अडचणींवर कंपनी व्यवस्थापनाचे मतं जाणून घेण्यात आली.रात्री अपरात्री कामावरून सुटणाऱ्या कामगारांना लुटणाऱ्या काही भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची प्रमुख मागणी यामध्ये करण्यात आली असून, सध्या तरी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात अन्य समस्यांना तोंड फुटलेले दिसत नाही.
दरम्यान, औद्योगिक क्षेत्रातील होणाऱ्या अपघाताच्या बाबतीत देखील गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याचे व कंपनीत होणाऱ्या विविध चोरीच्या घटना लक्षात घेता कंपनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक,सीसीटीव्ही कॅमेरे,कामगारांची पोलीस पडताळणी व इतर बाबींचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापनाला करण्यात आल्या असून महिला कामगारांना दिवसपाळीच्या वेळाच प्रामुख्याने देणे तसेच कंपनीत त्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत पोलीस निरीक्षक घुगे यांनी व्यक्त केले.
सर्व काही आलबेल?
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील भंगार, केमिकल विक्री,बांधकामातील माफियांचे जाळे,पाणी पुरवणारे टँकर माफिया अशा विविध क्षेत्रांतील गुन्हेगारी अजून तरी प्रकर्षाने पुढे आलेली नसली तरी मात्र त्यांची थोडीफार धुसफूस अधूनमधून सुरूच असते. त्यामुळे वरून सर्व काही आलबेल दिसत असले तरी गुन्हेगारी व्यक्तीचा समावेश थोड्याफार प्रमाणात दिसून येतच असतो.