पुणे (धायरी) : पुणे महानगरपालिकेच्या स्व. मुरलीधर लायगुडे दवाखान्यातील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याप्रकरणी खडकवासला विभागप्रमुखांसह दोघांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे.
निलेश दशरत गिरमे (वय . ३५) हेमंत काळुराम भगत (वय. ४८) लोकेश रवी राठोड (वय. २१, रा.धायरी) अशी तीन अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
याप्रकरणी लायगुडे दवाखान्यातील औषध निर्माण अधिकारी कल्पेश घोलप यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घोलप हे लायगुडे दवाखान्यात औषध निर्माण अधिकारी म्हणून काम करीत आहेत. मंगळवारी सकाळी १२ वाजण्याच्या दरम्यान शिवसेनेचे विभागप्रमुख निलेश गिरमे व त्यांचे साथीदार लोकेश राठोड, हेमंत भगत हे तिघेजण लायगुडे दवाखान्यात आले. त्यांनी केसपेपर न काढता घोलप यांच्याकडे औषधांची मागणी केली. यावेळी घोलप यांनी केसपेपर काढून आणल्यानंतर औषधे मिळतील,असे सांगितल्यानंतर आरोपींनी केसपेपर न काढता अरेरावीची भाषा करून फिर्यादीला धक्काबुकी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना शासकीय कामात अडथळा आणून कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त केल्याने फिर्यादीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्चना बोधडे करीत आहेत.