पुणे : त्याचे तिच्यावर मनापासून प्रेम होते. तिच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होता. मात्र, घरच्यांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. घरातील लोकांच्या धाकातून ती आता त्याच्याशी बोलणे टाळू लागली. त्यामुळे रागाच्या भरात त्याने आपल्या प्रेमिकाला वाटेत गाठले. तिने नकार देताच अगोदरच आणलेल्या चाकूने तिच्यावर सपासप वार करून तिचा खून केला.
एकतर्फी प्रेमातून तरुणींवर हल्ले करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. काही वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून प्रेमिकेच्या अंगावर ॲसिड टाकून तिला विद्रूप करण्याचे प्रकार राज्यात घडले होते. ॲसिडवर निर्बंध आणल्यानंतर हे प्रकार जवळपास थांबले. तरीही एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ले होण्याचे प्रकार काही केल्या थांबले नाहीत. काही वर्षांपूर्वी पुण्यात निता हेंद्र या तरुणीचा असा एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला होता.
कबड्डीपटू मुलीची हत्या एकतर्फी प्रेमातून तरुणाने १४ वर्षाच्या कबड्डीपटू मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बिबवेवाडी भागात नुकतीच घडली आहे. बिबवेवाडी येथील यश लॉन येथे कबड्डीचा सराव करण्यासाठी गेली असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या ओंकार भागवत याने चाकूने वार करून तिची हत्या केली होती.
एकतर्फी प्रेमातून तरुणाचा खून
एका मुलीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका तरुणाचा खून शंकर महाराज वसाहतीमध्ये झाला होता. मुलीचा भाऊ आणि त्याच्या मित्रानेच हा खून केल्याचे सहकारनगर पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले होते.
व्हाइट कॉलरकडून सायबर गुन्ह्यांचा वापर
आपल्याला आवडणारी तरुणी आपली होऊ शकली नाही तर तिची बदनामी करायची. तिच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील फोटो, व्हिडिओ टाकून तिचा मोबाइल नंबर देऊन तिला त्रास देण्याचे प्रकार आता होऊ लागले आहेत. याबाबत सायबर पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तपासामध्ये संबंधित तरुणीच्या कार्यालय, मित्रांकडूनच असे प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. त्यात काही सॉफ्टवेअर इंजिनिअरही सापडले आहेत.