पुणे : महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने शहरातील गल्ली बोळातील भाई-दादांनी डोकं वर काढले आहे. शहरातील सराईत गुंडांच्या टोळ्यांनी वर्चस्ववादातून राडा सुरू केला आहे. वाहनांची तोडफोड करून, भररस्त्यात वाढदिवसांचे केक कापून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून दहशत पसरविण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशा गुंडांच्या टोळ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली असून गेल्या वर्षभरात अशा ६३ टोळ्यांमधील साडेचारशेहून अधिक गुंडांवर मोक्का कारवाई केली आहे.
शहरात या टोळ्यांची दहशत
कुख्यात गुंड गजा मारणे व त्याच्या टोळीतील गुंडांवर पोलिसांनी वेगवेगळ्या कायद्याखाली कारवाई केली असली तरी शहराच्या पश्चिम भागात या टोळीची सर्वाधिक दहशत आहे. त्याचबरोबर मध्य वस्तीत आंदेकर टोळीची मोठी दहशत आहे. नीलेश घायवळ, शरद मोहोळ यांच्या टोळीची दहशत काही भागात आहे.
पोलिसांकडे सर्वच गुन्हेगारांची कुंडली
अनेक गुन्हेगार गंभीर गुन्हे केल्यानंतरही काही दिवसात जामिनावर सुटून पुन्हा आपल्या हद्दीत येऊन गुन्हेगारी कृत्य करत असत. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढली होती. त्यामुळे पोलिसांनी या सर्व गुंडांचे रेकॉर्ड तयार केले. त्यावरून त्यांच्यावर तडीपार, मोक्का, स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. गेल्या वर्षी ५१ गुंडांवर एमपीडीएखाली कारवाई करून त्यांची तुरुंगात रवानगी केली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत ६३ सराईतांवर एमपीडीएखाली कारवाई केली आहे.
एमपीडीएखाली कारवाई
२०२१ - ५१
२०२० - ८
२०१९ - १९
१५९ तडीपार
प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही दहशत पसरविणे, दमदाटी करून नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडांवर त्या त्या परिमंडळ उपायुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला. गेल्या वर्षभरात शहर पोलिसांनी १५९ गुंडांना १ ते २ वर्षांसाठी पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
गजा मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेवर मोठी रॅली काढली होती. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या छोट्या-मोठ्या गुंडांना स्थानिकांकडून मिळणारा भीतीयुक्त आदर तरुण पाहतात. त्यातून अशा गुंडांचे फोटो स्टेटसला तरुण ठेवत होते. गुन्हेगाराशी संबंध नसलेल्या पण गुंडांचे आकर्षण असलेल्या अशा तरुणांना बोलावून पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले होते. त्यावेळी भररस्त्यात वाढदिवसाचे केक तलवारीने कापून त्याचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत पसरविणाऱ्या गुंडांवर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कारवाई करून त्यांना गजाआड केले आहे.