पुणे : सायकल खेळत असताना विजेच्या खांबाचा शॉक लागून वारजे येथे एका बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वारजे पोलिसांनी महापालिकेच्या विद्युत अभियंत्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. १८ आॅगस्टला सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बंगलोर हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. यावेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून तो जागेवरच मयत झाला. यानंतर वारजे पोलिसांनी एमएसईबीच्या विद्युत निरीक्षकांना अहवाल पाठवला होता. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा खांब पुणे महापालिकेचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानूसार पुणे महापालिकेच्या विद्युत अभियंत्याच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पृथ्वीराज हा एका खासगी शाळेमध्ये सहावी इयत्तेत शिकत होता. शाळेला सुट्टी असल्याने तो सायकलींग करण्यासाठी घराबाहेर पडला होता. सायकलींग करताना त्याच्या सायकलचा धक्का रस्त्यावरील वीजेच्या खांबाला लागला. विजेच्या खांबात वीज प्रवाह असल्याने शॉक लागून तो जागेवरच कोसळला.आजूबाजूच्या नागरिकांनी त्याच्या घरच्यांना याची माहिती दिली. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. संततधार पावसामुळे वीजेच्या खांबात वीज प्रवाह पसरल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांचे मत आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जी. बी. माने करत आहेत.
महापालिकेच्या विद्युत अभियंत्याविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 6:52 PM
मुंबई-बंगलोर हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. यावेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून तो जागेवरच मयत झाला होता.
ठळक मुद्देसंततधार पावसामुळे वीजेच्या खांबात वीज प्रवाह पसरल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांचे मत