पिंपरी : निगडी येथील विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेतील शस्त्रे खोटी होती. तरीही पोलिसांनी कायद्याचा गैरवापर करत जाणीवपुर्वक व सूडबुद्धीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. यातून विश्व हिंदू परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी कायद्याचा गैरवापर करणाऱ्या पोलीस पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करुन आमच्यावर दाखल केलेले पूर्वग्रहदुषित खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी दुर्गावाहिनी प्रांतप्रमुख मृणालिनी पडवळ, जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा मंत्री नितीन वाटकर उपस्थित होते. रविवारी निगडी येथे विश्व हिंदू परिषदेच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलींकडे एअर रायफल व तलवारी होत्या. तसेच ही शोभायात्रा विनापरवाना काढल्याबाबत निगडी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विवेक कुलकर्णी बोलत होते. ते म्हणाले, विश्व हिंदू परिषदेचा दुर्गावाहिनी हा विभाग युवतींच्या शारीरिक, मानसिक व बौद्धीक अशा सर्वांगीण विकासासाठी देशभरातने महिन्यात शौर्य प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो. याचाच एक भाग म्हणून २७ मे ते ३ जून या कालावधीत निगडी येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त रुपीनगर मैदान ते ठाकरे मैदान या दरम्यान २ जूनला शोभायात्रा काढण्यात आली. विहिंपने दुर्गावाहिनी शोभायात्रेसाठी निगडी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यावर पोलीस प्रशासनाने आम्हाला पोहोच दिली. यासह पोलीस बंदोबस्तही दिला. त्यामुळे विनापरवानगी हे कलम लागू होत नाही. पोलीस प्रशासनाने पोहोच दिल्यामुळे व जमावबंदी बद्दल कोणतीही आगाऊ सूचना न दिल्यामुळे शोभायात्रेचे आयोजन केले. यासाठी निकाळजे व पवार या पोलीस अधिकारयांसह पोलीस बंदोबस्त दिला. मात्र, हे दोन्ही अधिकारी जाणीवपूर्वक दुटप्पीपणाने वागत आपल्या कर्तव्यात कसूर करत होते. पूर्वगृहदूषित मानसिकतेने त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत व वाद घातला. दरम्यान, आमच्याकडील शस्त्रे खोटी आहेत, ती तपासावीत असे आवाहनही त्यांना केले असताना पोलीस अधिकाऱ्यांनी शस्त्रे तपासली नाहीत. शिवाय ही शस्त्रे खरी आहेत असा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. व या अहवालाच्या आधारे खोटी तक्रार दाखल केली. त्यामुळे जाणीवपुर्वक, सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अशाप्रकारे युवतींच्या गटावर व ज्यांनी परवानगी मागितली असा विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करणे हे अनाकलनीय आहे. या घटनेमुळे विश्व हिंदू परिषदेची जाणीवपुर्वक देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न दिसतो. निकाळजे व पवार हे पोलीस अधिकारी कायद्याचा गैरवापर करत कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा व दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे.
पूर्वग्रहदुषित खोटे गुन्हे मागे घ्यावेत ; अन्यथा आंदोलन : विश्व हिंदू परिषदेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 7:33 PM
पोलिसांनी कायद्याचा गैरवापर करत जाणीवपुर्वक व सूडबुद्धीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले.
ठळक मुद्देविश्व हिंदू परिषदेच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मुलींकडे एअर रायफल व तलवारी प्रकरण