-किरण शिंदे
पुणे : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही? कसलेही व्हिडिओ बनवायचे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करायचे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची. असे प्रकार मागील अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. मात्र कधी-कधी अशाप्रकारचे रिल्स बनवणे चांगलेच महागात पडते. याचा प्रत्यय पुण्यात पुन्हा एकदा आला. रिल्सच्या माध्यमातून थेट पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला बेड्याही ठोकल्या आहेत.
या रिल्सच्या माध्यमातून थेट पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या या तरुणाचं नाव आहे पवन भारती. अवघ्या वीस वर्षाचा हा तरुण. हे हडपसर गाव आहे इथं दुनियादारी नाही तर गुन्हेगारी चालते.. असं म्हणत त्याने थेट पोलिसांनाच आव्हान दिलं होतं. मग काय त्याचं हे रिल्स भलतंच व्हायरल झालं. इतक व्हायरल झालं की पोलिसांनाही त्याची दखल घ्यावी लागली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास करत अवघ्या काहीच तासात हडपसर परिसरातूनच त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक लोखंडी कोयता देखील सापडला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाच मात्र त्याच्याकडून एक माफीनामाही वदवून घेतलाय माफीनामा.
पुण्यात यापूर्वी थेरगाव क्वीन नावाने अश्लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर वायरल करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हडपसरचा बादशहा हा देखील असाच काहीसा प्रयत्न करायला गेला आणि तुरुंगात जाऊन बसला.