पुणे : सदनिकेच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात २५ लाख रुपये वसूल करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहात रवानगी झालेल्या आरोपीने पत्नी जिज्ञासा रजपूत हिला 33 चिठ्ठ्या पाठविल्या असून, यात कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची शक्यता समोर आली आहे. तसेच आरोपी कारागृहात बेकायदेशीरपणे मोबाइल वापरून त्याच्या पत्नीस मेसेज करून गुन्ह्यातील सर्व प्रकार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात बहीण राणी सागर मारणे ही जिज्ञासा हिच्या मोबाइलवरून आरोपी सागर रजपूत याच्या संपर्कात राहून त्याच्या सांगण्याप्रमाणे आणि त्याने वेळोवेळी पाठविलेल्या चिठ्ठ्यांनुसार बाहेरील कामे करून त्याला मदत करीत होती.
आरोपीचे निरोप बाहेरील लोकांना देणे, धमकावणे, भेटणे, वस्तू पोहोच करणे, चिठ्ठ्यांतील निरोप देणे व घेणे, संबंधितांना रकमा पुरविणे ही सर्व कामे अटक आरोपी राणी मारणे हिने केली असून, तिचा संपूर्णपणे सक्रिय सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे सत्र न्यायाधीश ए.एन. मरे यांनी राणी मारणे हिचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळला.
हा प्रकार २०१८ ते २२ जूनदरम्यान कोथरूड परिसरात घडला. याबाबत ५३ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून सागर रजपूतसह जिग्नेशा राजपूत, प्रभावती रजपूत, राणी मारणे, अमित काळे, भुड्या यांसह अन्य पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सागर कल्याण राजपूत (वय ३४, रा. शास्त्रीनगर, कोथरूड. मूळ रा. कल्प डिझायनर गोत्री, वडोदरा, गुजरात) आणि राणी सागर मारणे (वय २७, रा. कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. सागर हा सध्या येरवडा कारागृहात आहे, तर राणी हिला अटक करून तिची देखील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. राणी हिला अटक होण्यापूर्वी सागरने तिला सांकेतिक भाषेत चिठ्ठी पाठवली होती. या चिठ्ठ्या पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केल्या आहेत.
दरम्यान, राणी हिने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी जामिनास विरोध केला. आरोपी राणी मारणे हिच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता तिने तपासाकामी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. तसेच तिला तपासात केलेल्या चौकशीमध्ये लोकांची नावे माहिती आहेत. तपासाबाबतची तिला पूर्ण कल्पना असल्याने ती गुन्ह्यातील साक्षीदार व आरोपींना भेटून गुन्ह्यातील साक्षी व पुराव्यांत बदल करण्याची आणि साक्षीदारांना फितूर करण्याची दाट शक्यता आहे. राणी मारणे हिला जामीन मंजूर केल्यास तपास योग्य दिशेने करता येणार नाही, असा युक्तिवाद सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरीत राणे मारणेचा जामीन अर्ज फेटाळला.
---------------------------------------------