कोरेगाव भीमा : येत्या १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्हॉट्सअॅप ग्रुपवर समाज विघातक पोस्ट, मजकूर, व्हिडीओ, आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास व त्यातून कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अॅडमिनला सर्वस्वी जबाबदार धरून प्रचलित नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२० ग्रुप अॅडमिन व लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४१० ग्रुप अॅडमिनला त्यासंदर्भात लेखी नोटिसा पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. या पुढील काळात ग्रुप अॅडमिनला ग्रुपवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.१ जानेवारी २०१८ च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार परिसरात न घडू देण्यासाठी गेल्या वर्षीपासून जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून छोट्या छोट्या गोष्टींवरही जिल्हा पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे. दंगलीनंतर व्हाट्सअॅप ग्रुप, फेसबुकसारख्या अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट, तसेच व्हिडीओ पसरवित असतात. त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडले जाते. यासाठी जिल्हा प्रशासनाने १ जानेवारी २०२० च्या मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस ठाण्यातील १२० व लोणीकंद पोलीस ठाण्यातील ४१० ग्रुप अॅडमिनला या संदर्भात नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपवर समाज विघातक पोस्ट, मजकूर, व्हिडीओ, आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास व त्यातून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अॅडमिनला सर्वस्वी जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या नोटिसा गुन्हा शाबितीकरणासाठी न्यायालयात पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहेत. यात ग्रुप अॅडमिनवरच गुन्हा दाखल होऊन या गुन्ह्यात तीन वर्षे शिक्षाही भोगावी लागणार आहे. .......पोलीस प्रशासन सतर्क जानेवारी २०१८ दंगलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन गतवर्षीपासून सतर्क झाले असून, गतवर्षीप्रमाणेच पोलीस फौजफाटा व अत्याधुनिक शस्त्रास्त्रासह पोलीस दल बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहे. यामध्ये कोणतीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर त्याापासून संरक्षण करण्यासाठी २२ दंगल नियंत्रक पथक तयार करण्यात आले आहेत. लोणीकंद ते शिक्रापूर दरम्यान तयार करण्यात येणाºया या प्रत्येक पथकात पोलीस अधिकाºयांसह हँडगे्रड मशिन्स, गॅसगन, गॅससेल, एसएएलआर रायफल, १२ बोअर बंदुका, ढाली, लाठ्या, सिंगार्ड, हेल्मेट, वज्ररक्षक वाहन, अग्निशामक वाहन, अग्निप्रतिबंधक बॉल्स, मेगाफोन, दुर्बिण आदी साहित्यांसह जिल्हा पोलीस दल बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहे..........
व्हॉट्सअॅप ग्रुपअॅडमिनवर होणार गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 2:25 PM
आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ संदर्भात ५३० ग्रुप अॅडमिनला बजावल्या नोटिसा
ठळक मुद्देकारवाई करण्यास सुरुवात कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अॅडमिनला सर्वस्वी जबाबदार