पुणे : वृक्ष पुनर्रोपणासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीची गरज नाही असे म्हणणारे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना बहुतेक वृक्ष संवर्धन कायद्याची माहिती दिसत नाही. त्यांनी ती करून घ्यावी व मेट्रोचे काम करताना त्या कायद्याचे पालन करावे अन्यथा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा इशारा वृक्ष प्राधिकरण समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या वतीने देण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, समितीच्या सदस्य शिल्पा भोसले, मनोज पाचपुते हे यावेळी उपस्थित होते. मेट्रो मार्गाचे तसेच डेपोचे काम करताना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांचे महामेट्रोच्या वतीने पुनर्रोपण करण्यात येत आहे. त्यासाठी वर्षभरापूर्वी मेट्रोने समितीकडे परवानगी मागितली होती. त्यानंतरही तीन प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र, समितीकडून त्यावर काही निर्णयच झाला नाही. दरम्यानच्या काळात महामेट्रोला त्यांच्या डेपोचे काम करणे गरजेचे असल्याने त्यांनी त्या जागेवरील वृक्षांच्या पुनर्रोपणाचे काम सुरू केले. त्यावर समितीच्या वतीने हरकत घेण्यात आली होती. दिक्षित यांनी त्यावर बोलताना महामेट्रो एकही झाड तोडणार नाही तर त्यांचे पुनर्रोपण करणार आहे , असे सोमवारी सांगितले होते.त्याचाच आधार घेत भोसले यांनी महामेट्रो वृक्ष संवर्धन कायद्याचे पालन न करता काम करत असल्याचा आरोप केला. पुनर्रोपण करणार असाल तर त्यालाही परवानगी लागते, वृक्ष तोडणारच नाही तर त्यासाठी परवानगी मागणारे प्रस्ताव दाखलच का केले, ही पुणेकरांनी फसवणूक आहे असा आरोप भोसले यांनी केला. तुपे म्हणाले,कायद्याचे पालन केले जात नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल. प्रसंगी महामेट्रोवर कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही तुपे यांनी यावेळी दिला.
..... तर ‘मेट्रो’ वर फौजदारी गुन्हा दाखल करू : राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 8:09 PM
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांना बहुतेक वृक्ष संवर्धन कायद्याची माहिती दिसत नाही. त्यांनी ती करून घ्यावी अन्यथा त्यांच्या विरोधात...
ठळक मुद्देवृक्ष प्राधिकरण समितीचे प्रकरणमहामेट्रो वृक्ष संवर्धन कायद्याचे पालन न करता काम करत असल्याचा आरोप