पुणे : उंड्री परिसरात हातभट्टी चालविणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करुन त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. भिमय्या लिंगय्या भंडारी (वय २३, रा. कानडेनगर, उंड्री) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
भिमय्या भंडारी हा सराईत गुन्हेगार आहे. तो साथीदारांसह हातभट्टी दारुचा साठा करुन विक्री करत असे. त्याच्याविरोधात मागील २ वर्षामध्ये ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे व पीसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव तयार केला. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन भंडारी याला एक वर्षाकरीता नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी शहरात दहशत निर्माण करणार्या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेच्या ९१ कारवाया केल्या आहेत.