वीज मीटरमध्ये फेरफार : आठ महिन्यांत १७०३ वीजचोऱ्या उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वीज मीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. मात्र, असे निदर्शनास आल्यास जबर दंड वसूल केला जात आहे. पुणे प्रादेशिक विभागात अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका दिला आहे. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या १७०३ वीजचोऱ्या आणि अनधिकृत वीज वापर केल्याचा समावेश आहे. आठ महिन्यांत पाच कोटी ७६ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघड झाले असून, रितसर त्यांना बिल देण्यात आले आहे. त्यापैकी एक कोटी ७८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीजचोऱ्या आणि अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांना जानेवारीपासून आतापर्यंत म्हणजे मागील आठ महिन्यांत पुणे प्रादेशिक विभागात सुमारे एक कोटी ७८ लाख रुपयांची बिले संबंधिताना दिली आहेत. त्यांच्याकडून वसुली करण्यात येत आहे. काही ग्राहकांवर फौजदारी कारवाईदेखील करण्यात येत आहे.
----
पाॅइंटर्स
महावितरणची आठ महिन्यांतील वीजचोरी कारवाई
* पुणे विभागात आतापर्यंत १७०३ वीजचोऱ्या उघड
* पाच कोटी ७६ लाखांची बिलं संबंधिताना दिली
* एक कोटी ७८ लाख रुपये आतापर्यंत वसूल
----
* वीजचोरीसाठी अशीही चलाखी
वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून अनेकजण वीजचोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. वीजचोरी उघड झालेल्या १७०३ प्रकरणात या बाबी प्रामुख्याने समोर आल्या आहेत. अशा प्रकारे वीजचोरी करणाऱ्यांवर दंड वसूल करून फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
---
* फौजदारी गुन्हा अन् जबरी दंड
वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. तसेच वीजचोरीविरुद्ध नियमितपणे सुरू असलेली मोहीम आणखी वेगवान करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.