पुणे : वृक्षतोडविरोधी कायद्यामध्ये गंभीर शिक्षेची तरतूद करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे असे अर्थमंत्री तथा वन, पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत मुनगंटीवार यांनी पुण्यात पुण्यासह ५जिल्ह्याची बैठक घेतली व तीन महिन्यात ५ कोटी ४७ लाख ५१ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले.
मुनगंटीवार म्हणाले, एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के वनआच्छादन असणे गरजेचे आहे. राज्यात हे प्रमाण २० टक्के आहे. ते वाढावे यासाठी सलग ४ वर्षांपासून वन विभाग वृक्षारोपणाची मोहिम पावसाळ्यापूर्वी काही महिने आधी राबवत आहे. त्यामुळे राज्याचे वन आच्छादन क्षेत्र २७३ चौरस किलोमीटरने वाढले आहे. राज्य सरकारने सन २०१७ ते २०१९ दरम्यान राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. २०१९ मध्ये १जुलै ते ३० सप्टेबर दरम्यान ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
आतापर्यंत केलेल्या वृक्षलागवडीपैकी वृक्ष जगण्याचे राज्यातील प्रमाण ८६ टक्के असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले, नागपूर येथे एक कमांड सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यात वन विभागाने केलेल्या वृक्ष लागवडीची सर्व अद्ययावत माहिती छायाचित्रांसहित दिसते. जुलै ते सप्टेंबर च्या वृक्षरोपण कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यावेळी उपस्थित होते.
चंद्रपूरमध्ये वृक्षारोपणाचे सगळे नियोजन चुकलेले आहे, गरज नसताना वृक्षारोपण केले जात आहे असा आरोप माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी केला आहे. त्याबाबत मुनगंटीवार म्हणाले,कोणी काहीही आरोप केले तरी वृक्षारोपण सुरूच राहणार आहे.