पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे आणि शरद मोहोळ हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यातच मारणे आणि मोहोळ यांना एकाचवेळी पोलिसांनी बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर केले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन कट्टर विरोधक कित्येक वर्षांनंतर एकमेकांच्या समोर येत असल्याने न्यायालय परिसरात मोहोळ आणि मारणे यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांच्या न्यायालयाने कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि त्याच्या चार साथीदारांची जामिनावर मुक्तता केली आहे. तर गजानन मारणे व त्याच्या साथीदारांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले होते. तसेच गुंड शरद मोहोळने देखील पुण्यातील एका कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांनाही पोलिसांनी त्यांच्या साथीदारांसह अटक केली आहे. पोलिसांनी दोघांनाही पोलिसांनी एकाच वेळी कोर्टात हजर केले. कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि त्याच्या चार साथीदारांना खडक पोलिसांनी अटक केली होती.
खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यावर गुंड शरद मोहोळ याने गेल्या एका कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन केल्याप्रकरणी त्याच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी मंगळवारी (ता.16) रात्री अटक केली आहे. गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३८), विश्वास बाजीराव मनेरे (वय ३७), मनोज चंद्रकांत पवार (वय ४२), स्वप्नील अरुण नाईक (वय ३५) आणि योगेश भालचंद्र (वय ४०) यांना अटक करण्यात आली होती. तर अक्षय भालेराव, सीताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ याला एका संघटनेच्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी २६ जानेवारी रोजी त्याला बोलविण्यात आले होते. त्या कार्यक्रमास मोहोळ व त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे आले होते. तेव्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. आरोपींनी आकडाआरडा करून दहशत निर्माण केली. त्यामुळे नागरिक घाबरून पळाले होते. त्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.