पुणे : नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडील दुचाकीच्या डिक्कीची तपासणी केली असता त्यात घरफोडीत चोरलेले सोन्याचे दागिने आढळून आले.
सुमित मोहन शिंदे (वय २२, रा. राजीव गांधीनगर, येरवडा) आणि ऋतिक दत्ता सारगे (वय १९, रा़ सुरक्षानगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी चंदननगर भाजी मंडईत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचला. यावेळी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन दोघे जण येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी थोड्याच अंतरावर पाठलाग करुन त्यांना पकडले़ त्यांच्याकडील दुचाकीची तपासणी केली. दुचाकीच्या डिक्कीत ४४ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आढळून आले. त्याविषयी चौकशी केल्यावर त्यांनी सहा ते सात दिवसांपूर्वी गाडीवरुन दुपारच्या वेळी खराडी बायपास रोडवरील सोसायटीमधील एका बंद फ्लॅटचे दरवाजाचे लॉक व कडी कोयंडा तोडून एका बॅगेमधील सोन्या चांदीचे दागिने चोरले असल्याची कबुली दिली.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सुनिल जाधव , पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, सहा पोलीस फौजदार युसुफ पठाण, पोलीस अंमलदार राजेश नवले, अमित जाधव, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, सुभाष आव्हाड, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर यांनी केलेली आहे.