पुणे : सुतारदरा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार सराईताला एका वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
साहिल हनुमंत हळंदे (वय २१, रा. दत्तनगर, गणेश कॉलनी, सुतारदरा) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. गेल्या सात महिन्यात पोलिस आयुक्तांनी १७ सराईतांवर एमपीडीएनुसार कारवाई करून त्यांना कारागृहात स्थानबध्द केले आहे. गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्तांकडून ही कारवाई सुरू राहणार आहे.
साहिल हळंदे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गेल्या ५ वर्षात गंभीर स्वरूपाचे ४ गुन्हे दाखल आहेत. त्याची परिसरात दहशत होती. त्यामुळे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी हळंदे याचा एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून पोलिस आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी हळंदे याच्यावर कारवाईला मान्यता दिली. एका वर्षासाठी त्याला कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. सक्रिय व दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात कडक प्रतिबंधात्मक कारवाईचे धोरण पोलिस आयुक्तांनी अवलंबिले आहे.