पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये जबरी चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार, या गुन्हेगारांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ६८ हजार ४०० रूपयांचे दागिने, मोबाइल, दुचाकी, एलसीडी टीव्ही हस्तगत करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अभिजित ऊर्फ दाद्या अशोक रणदिवे (वय २१ ,म्हाडा कॉलनी, हडपसर), सतीश अण्णाजी केंदळे (वय ३२) यांच्यासह एक विधीसंघर्षित मुलगा आणि नोऐल ऐलेन शबान (वय २० रा. कोरेगाव पार्क) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून महागडे २४ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस स्टेशनच्या हददीत १५ मे रोजी सकाळी ६ वाजता सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील २ तोळ्याची साखळी चोरट्यांनी लंपास केली होती. दुसरी घटना १८ मे रोजी सकाळी ६.१५ वाजता भोसले गार्डन येथे घडली. एका ज्येष्ठ महिलेला कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील साखळी ओढून नेण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. त्याच दिवशी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बी. टी. कवडे रस्त्यावर एका टेम्पोचालकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा मोबाइल व रोख रक्कम चोरून नेली होती. हडपसर पोलीस ठाण्याची तीन पथके तयार करून गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला. जबरी चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार हे नवीन म्हाडा रस्त्यावरून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिन्ही पथकांनी सापळा रचला. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते भरधाव वेगाने जाऊ लागले. तेव्हा त्यांना न्यू इंग्लिश स्कूलजवळ पोलिसांनी गाठले. हडपसर पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, राजू अडागळे, दिगंबर शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनावणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, संदीप पांडुळे, पोलीस शिपाई शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार. प्रशांत टोणपे यांनी ही कामगिरी केली.
---------------------------------------