पिंपरी : अवैध धंद्यांना, चुकीच्या कामांना संरक्षण मिळावे, या उद्देशाने अनेक जण समाजकारणाचा थोडा दिखावा करून राजकारणात प्रवेश करतात. राजकीय पक्षसुद्धा त्या व्यक्तींची पार्श्वभूमी विचारात न घेता त्यांना पदे बहाल करतात, निवडणुकीत उमेदवारीही देतात. निवडून आल्यानंतर ते लोकप्रतिनिधी म्हणून वावरतात. अशा पद्धतीने गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय हा समाजस्वास्थ्यासाठी घातक ठरू लागला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्यांमध्ये बहुतांशी नगरसेवक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. मागील ‘टर्म’मध्ये तब्बल ४३ नगरसेवक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. नागरी प्रश्नावरील आंदोलन, मोर्चे याकरिता दाखल झालेले गुन्हे नव्हे, तर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, फसवणूक, दंगल, धमकी, हाणामारी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले अनेक नगरसेवक महापालिकेत आहेत. परवाना घेऊन पिस्तूल बाळगणारे अनेक जण आहेत. दोन वर्षांपूर्वी एका नगरसेवकाने बेकायदा पिस्तूल बाळगल्याचे उघडकीस आले होते. अवैध धंद्यांत भागीदारी, जमीन खेरदी-विक्री व्यवसायात पडून दमदाटी, दडपशाहीचा अवलंब अशा प्रकारे ते माया जमाविण्याचा प्रयत्न करतात. महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेल्यांनतर त्यांच्यापैकी काहींची विषय समित्यांच्या महत्त्वाच्या पदावरसुद्धा वर्णी लागते. महापालिकेच्या माध्यमातून निकटवर्तीयांना पुढे करून ते विविध कामांचे ठेकेसुद्धा मिळवितात. गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही ‘व्हाइट कॉलर’ म्हणून समाजात बिनधास्त मिरविणाऱ्यांची राजकीय अभय मिळत असल्याने पोलिसांच्या ससेमिऱ्यातून सुटका होते. नेतेमंडळींच्या माध्यमातून पूर्वीचे गुन्हे मागे घेण्यासाठी पोलिसांवर ते दबावतंत्राचा अवलंब करतात. पदाचा जेवढा लाभ उठविता येईल, तेवढा ते उठवतात.सत्ताबदल होईल, त्यानुसार ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतात, जेणेकरून अवैध धंद्यांना, चुकीच्या कामांना संरक्षण मिळत राहील. (प्रतिनिधी)
गुन्हेगारांना ‘राजाश्रय’
By admin | Published: September 06, 2015 3:31 AM