मनसे नेत्याने पत्र पाठवून केली विनंती
बारामती :बारामती शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती भीषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बारामती शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची भासणारी कमतरता, रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागणारी धावपळ या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांनी केला आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी अॅड. पाटसकर यांनी केली आहे.
राज्यपालांना याबाबत अॅड. पाटसकर यांनी पत्र लिहीत साकडे घातले आहे. या पत्रात अॅड. पाटसकर यांनी स्थानिक प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे.येथील स्थानिक प्रशासन राजकीय दबावाखाली नियमबाह्य थेट रुग्णांना इंजेक्शन देत नाही.तर स्थानिक सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली जात आहेत. ते कार्यकर्ते त्यांच्या ओळखीच्या लोकांना ही इंजेक्शन देत आहेत. प्रशासन एका पक्षाच्या हातातील बाहुले बनले आहे,असे वाटण्यास वाव असल्याचे पाटसकर यांनी यामध्ये नमूद केले आहे.
बारामती येथील स्थानिक प्रशासन निर्णय घेताना कधीच विरोधी पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नाही.एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सर्व बैठकांना बोलविले जाते. अधिकाऱ्यांचा अंकुश नसल्याने औषध व्यावसायिक मनमानी करीत आहेत.रेमडेसिविरच्या बाबतीत सखोल आॅडिट होण्याची गरज आहे.या वितरणाची जबाबदारी प्रशासनाची आहे,मात्र, ते दबावाखाली काम करीत आहेत. बारामतीचे उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,औषध निरीक्षक हे प्रशासकीय अधिकारी भेदभाव करीत आहे.ते त्यांची जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडत नाहीत.त्यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी,अशी मागणी पाटसकर यांनी केली आहे.
———————————————
बातमी सविस्तर घेणे