श्रीकिशन काळे पुणे : कोरोना वटवाघुळांमुळे होतो, या गैरसमजातून शहरात अनेक ठिकाणी झाडं तोडली जात आहेत. खरंतर वटवाघळाने कोरोना होत नसून, उलट रात्री मानवाला उपद्रवी ठरणार्या कीटकांचा ते नायनाट करतात. त्यामुळे ते मानवाचे मित्रच आहेत. त्यांचे घर असणारी झाडं तोडू नयेत, असे आवाहन पर्यावरण अभ्यासकांनी केले आहे.
चीनमध्ये वटवाघुळामुळे कोरोना आल्याचे बोलले जाते, पण अजून सिद्ध झाले नाही. परंतु याचा परिणाम मात्र पुण्यात दिसून येत आहे. झाडांवर वटवाघुळ बसून ते कोरोना आपल्या घरात येईल, या भितीने लोकं झाडं तोडत आहेत. बिबवेवाडी, सहकारनगर २, कर्वे रस्ता, कर्वेनगर परिसरात अशा घटना झाल्या आहेत.
वटवाघळावर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड म्हणाले, भारतात विमानाने कोरोना आला, वटवाघळाने नाही. भारतीय वटवाघळाने कोरोना पसरत नाही. खरं तर आपल्यातील प्रतिकारशक्ती कमी झालीय, प्रदूषण वाढलेय यावर लक्ष द्यायला हवे. उलट वटवाघुळ हे रात्री आपलं अन्न खातं आणि दिवसा झाडावर झोपते. डास आणि शेतीला अपाय करणारे व इतर कीटक ते खातात, जे आपल्याला घातक आहेत. बिया खाऊन ते इतरत्र टाकतात, त्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होते. रात्री खाद्य शोधताना वटवाघुळ त्याच्याकडील अल्ट्रा सोनिक सिस्टिम सुरू करतो. ते रडारचे काम करते. कीटक किंवा डास असल्यास त्यावर ते प्रकाश टाकून ते खाऊन टाकतात.=========================
वटवाघुळ पक्षी नसून, सस्तन प्राणी आहे. यामध्ये सुमारे ९७ टक्के पांढऱ्या पेशी असून, मानवात ३० टक्के असतात. जेव्हा ते उडतात तेव्हा त्यांच्या शरीराचे तापमान ४० डिग्री तापमान होते. त्यात कोणताही विषाणू जिवंत राहू शकत नाही. म्हणून त्यांच्याकडून कोरोना होणं शक्यच नाही. - डॉ. महेश गायकवाड, वन्यजीव संशोधक ==============================आमच्या इथे सहकारनगरमध्ये उंबराचे मोठे झाड होते. त्यावरील वटवाघुळांमुळे कोरोना पसरेल म्हणून ते तोडले. खरंतर हा अतिशय चुकीचा समज आहे की, वटवाघुळामुळे कोरोना पसरतो. विनाकारण त्यांची झाडांवरील आश्रयस्थाने नष्ट केली जात आहेत. वन विभागाने पुढाकार घेऊन त्याबाबत निवेदन जाहीर करायला हवे की, वटवाघुळांमुळे कोरोना पसरत नाही. - शेखर नानजकर, संस्थापक, वाइल्ड संस्था ==============================