घरोघरी जाऊन कचरा गोळा करून ओला आणि सुका कचरा वेगळा करून नागरिक व शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या शहरातील कचरावेचक कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामध्ये आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात कचऱ्याची येणारी प्रचंड दुर्गंधी, भिजून जड झालेला कचरा ठेवण्याचा प्रश्न आणि सतत पावसा-पाण्यात भिजून सर्दी, ताप, अंगदुखीचा त्रास यामुळे पावसाळा कचरावेचक कर्मचाऱ्यांची परीक्षा पाहणारच ठरतो. यामुळे कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने त्वरित वर्गीकरण शेड उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ‘स्वच्छ’ संघटनेच्या लक्ष्मीनारायण यांनी केली.कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत संघटना आणि ‘स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थे’च्या वतीने सन २००८ पासून पुण्यात दारोदार जाऊन कचरा गोळा करण्याचे काम केले जाते. यासाठी स्वच्छ आणि महापालिकेचा करारदेखील झाला आहे. या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीने कोणत्याही स्वरूपाचे मानधन अथवा पैसे दिले जात नाही. तर ज्या घराघरांतून हा कचरा गोळा केला जातो, त्याच लोकांकडून महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते. तसेच नागरिकांनी दिलेल्या कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करून ओला कचरा महापालिकेला दिला जातो. तर सुक्या कचऱ्यातील काही वस्तू पुनर्वापरासाठी विक्री करून त्यामधूनदेखील पैसे मिळविले जातात. त्यामुळे या कचरावेचक कर्मचाऱ्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह कचऱ्यावरच अवलंबून असतो.याबाबत लक्ष्मीनारायण यांनी सांगितले, की शहरातील कचरावेचक कर्मचाऱ्यांना नेहमीच विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु पावसाळा असला की या समस्यांमध्ये अधिक वाढ होते. पावसाळ्यामध्ये घरोघरी जाऊन नागरिकांनी दिलेला कचरा गोळा करायचा व सुका कचरा ठेवण्यासाठी किंवा कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची सोय नसल्याने रस्त्यावरच हा कचरा वेगळा करावा लागतो. पाऊस असल्याने सुका कचरा भिजून अधिक जड होतो. त्यामुळे कचऱ्याचे वजन वाढते व असा जड झालेला कचरा वाहून नेण्याचा मोठा प्रश्न कचरावेचक कर्मचाऱ्यांसमोर असतो. त्यात सुका कचरा भिजल्याने भंगार दुकानदारदेखील निम्म्याच दरामध्ये तो खरेदी करतात. यामुळे पावसाळ्यात कचरावेचक कर्मचाऱ्यांचा दुहेरी तोटा होतो.पावसा-पाण्यात दिवसभर काम केल्याने त्यातच कचरा ओला झाल्याने येणारी प्रचंड दुर्गंधी या सर्व गोष्टींचा कचरावेचक कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. सतत सर्दी, खोकला, ताप आणि मोठ्या प्रमाणात अंगदुखीचे आजार जडले जातात. आजारी पडल्यावर कचरा गोळा करायला सुटी झाली की नागरिक पैसे कट करून देतात. यामुळे दोन्ही बाजूने त्यांची कोंडी होते. यामुळे घर चालविण्यासाठी पावसा-पाण्यात आजारी असतानाही अनेक कर्मचारी काम करतात. यामुळे महापालिकेने या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण शहराचा विचार करता किमान प्रत्येक आरोग्य कोठीला एक याप्रमाणे किमान १३८ कचरा वर्गीकरण शेडची नितांत गरज आहे. परंतु सध्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्यादेखील शेड उपलब्ध नाहीत. या शेड उपलब्ध करून दिल्यास या कर्मचाऱ्यांच्या समस्या काही प्रमाणात तरी कमी होण्यास मदत होईल. झोपटपट्ट्यांमध्ये कचरा गोळा करणाऱ्या कचरावेचक कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीने काही मानधन दिले जाते. परंतु ते देखील वेळेत मिळत नसल्याचे लक्ष्मीनारायण यांनी स्पष्ट केले.दरम्यान अद्यापही नागरिकांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत जागरुकता नाही. आजही सॅनिटरी नॅपकीन व डायपर एका न्यूज पेपरमध्ये लाल ठिपका लावून वेगळ्या ठेवण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. याबाबत शासनाच्या वतीनेदेखील जनजागृती केली जाते. परंतु आजही ९९ टक्के महिला हा कचरा वेगळा ठेवत नाही. पावसाळ्यामध्ये सॅनिटरी नॅपकीनचा कचरा भिजल्यावर काय स्थिती होत असेल, याचा सर्वसामान्य नागरिकांनी एकदा तरी विचार करावा. अशा परिस्थितीतही ‘कचरावेचक’ कर्मचारी आपले काम करत राहतात. हे कर्मचारीदेखील समाजाचा एक घटक आहेत, याचा विचार करून नागरिकांनी किमान कचऱ्याचे वर्गीकरण तरी करावे.
पावसाळ्यात आरोग्याच्या गंभीर समस्या
By admin | Published: June 28, 2017 3:53 AM