- राजू इनामदार
पुणे: देशभरात सध्या काँग्रेसचं कुठेच अस्तित्व राहिलेले नाही. या पक्षाचा आवाज ना संसदेत आहे, ना रस्त्यावर ना लोकांमध्ये. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी नकारात्मकता आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही काम करत असतील तर त्यावर नुसती टीका आणि विरोध करणे हा काँग्रेसचा ठरलेला कार्यक्रम झाला असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकजण त्यांना काहीही माहिती नसताना बोलतात त्यामुळे ज्यांना माहिती नाही अशा विरोधकांच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. पत्रकारांनी ठाकरे सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार चौकशीप्रकरणी प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, जिथे गडबड आहे किंवा ज्याठिकाणी अनियमितता दिसतेय अशी कुठलीही चौकशी बंद होणार नाही. पण जिथे गडबड नाही आणि जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या चौकशी लावली आहे अशा चौकशी बंद केल्या जातील.
नांदेडमध्ये गोंधळ नाही-
नाना पटोलेंना वारंवार झटके येत असतात, त्यामुळे काहीही बोलत असतात, असा पलटवार फडणवीस यांनी पटोलेंवर केला. नांदेडमध्ये कुठेही धक्काबुक्की झाले नाही किंवा कुठेही लाठीचार्ज झाला नाही. विद्यार्थी पोलीस भरतीची मागणी करत होते. त्यावेळी मी जाऊन त्यांना भेटलो. लवकरच पोलिस भरती करणार असल्याचे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले, असं फडणवीस म्हणाले.
अजित पवारांना भरपूर वेळ-
सध्या अजित पवारांकडे खूप वेळ आहे त्यामुळे ते असे आरोप करत असतात. ते काय बोलतात यावर उत्तर द्यायला मला थोडीच वेळ आहे, मला खूप काम आहेत, असं फडणवीस म्हणाले.