पुणे : भाजपाशी युती न करता स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने अखेर भाजपाशी युती केली. या युतीवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही युती करत असल्याचे यावेळी शिवसेना भाजपाकडून सांगण्यात आले हाेते. साेशल मिडीयावर अनेक मिम्स आणि फाेटाेंच्या माध्यमातून या युतीवर टीका केली जात असताना, पुण्यातील निलायम चाैकात आता पुणेरी पाटीच्या माध्यमातून या युतीवर ताषेरे ओढण्यात आले आहेत.
ज्येष्ठ वात्राटिकाकार रामदास फुटाणे यांच्या नावाने चाराेळी लिहीण्यात आली आहे. ते म्हणाले - पटक देंगे, हे म्हणाले - झटक देंगे. ते म्हणाले- मस्ती, हे म्हणाले- कुस्ती. त्यांनी थाेपटली मांडी, यांनी थाेपाटले दंड. देण्या- घेण्याचे ठरताच बंड झाले थंड. गळ्यात गळे घालत खाेटे-खाेटे हसू लागले. एकशे चव्वेचाळीस बेरेजेतच फसू लागले. अशी चाराेळी करुन युतीवर टीका करण्यात आली आहे. हा फलक पुणेकरांच्या चर्चेचा विषय झाला आहे. पुण्यात विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या फलकांमधून नेहमीच राजकीय विषयांवर काेपरखळी मारली जाते. युतीची घाेषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा फलकांमधून यावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान 18 फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घाेषणा केली. विधानसभेमध्ये फिफ्टी फिफ्टी तर लाेकसभेसाठी राज्यातील 25 जागा भाजपा लढविणार असून 23 जागा शिवसेनेला देण्यात आल्या आहेत.