पुणे : शरद पवार यांचे कार्य मोठे आहे, त्यांचे आपत्ती व्यवस्थापन देशाने पाहिले आहे. आम्ही विरोधक असलो तरी त्यांच्यावर टीका करतो ते त्यांचा अनादर म्हणून नाही तर आदर ठेऊनच करतो. त्यांचा कामाचा वेग भरपूर आहे. या वयातही ते कोकणात गेले परंतु अजित पवार किंवा जयत पाटील गेले का? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, पवार यांचे आपत्ती व्यवस्थापन उत्तम आहे. पण सध्या या व्यवस्थापनाबाबत ते राज्य सरकारला मार्गदर्शन करताना दिसत नाहीत किंबहुना त्यांनी या सरकारमधील इतरांच्या व्यवस्थापनाला संधी दिली असेल. शरद पवार हे थेट कोकणात गेले, दोन दिवस तेथे राहिले यात त्यांना मानलंच पाहिजे असे सांगून पाटील यांनी, पवार दोन दिवस राहिले पण राज्याचे मुख्यमंत्री केवळ पहिल्या दिवशीच काही तासंच एका ठिकाणी जाऊन आल्याचे ते म्हणाले. कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ निसर्ग वादळ येऊन आज दहा दिवस उलटले तरी, त्यांना अद्याप एक रूपयांची मदत मिळालेली नाही़ त्यामुळे महापुराच्यावेळी जशी मदत आम्ही दिली तशी, किमान दहा-पंधरा हजार रूपयांची आर्थिक मदत या सरकारने प्रत्येक बाधिताला लागलीच द्यावी़ तसेच किमान दोन महिन्यांचा किराणाही त्यांना द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली़ दरम्यान तुम्ही काही करणार नाही व विरोधी पक्षाने मागणी केल्यावर आम्हीच राजकारण करतो ही ओरड योग्य नसल्याचेही ते म्हणाले़
कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे़ त्यातच निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठे नुकसान झाले आहे तरीही राज्य सरकार काहीही हालचाल करीत नाही़ हे सरकार गोंधळलेलं व लेचपेचं असल्यानेच कोणताही ठोस निर्णय त्यांच्याकडून होत नाही़ राज्यातील परिस्थिती हाताळण्यास हे सरकार अपयशी ठरले असून, गोंधळलेल्या या सरकारमध्ये कोणी निर्णय करायचे, कसे निर्णय घ्यायचे या सर्वच बाबींमध्ये गोंधळ आहे़ परिणामी कशाचाच निर्णय होत नसून त्याचा जनतेला त्रास होत आहे. १५ जून पासून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत ठोस निर्णय नाही, अंतिम वषार्ची परीक्षा घेण्याबाबत एकमत होत नाही़ उद्योग-धंद्याबाबत निर्णय नाही़ काही ठिकाणी उद्योग-धंदे सुरू झाले पण त्यासाठी कुठलाही समन्वय नाही असे सांगून त्यांनी, सांगली जिल्ह्यातील उद्योगांमध्ये काम करणाºया कामगारांना जिल्हाबंदी असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे उदाहरण दिले.