पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये खानापूर गावातील पाणवठ्याजवळ एक मगरीचे पिल्लू आढळले असून, ते पाण्याबाहेर आल्याने निसर्गप्रेमींनी त्याला वन विभागाच्या हाती सुपूर्द केले. उपचारासाठी ते राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिले आहे. ते थोडं मोठं झाल्यावर पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे.
काही वर्षांपूर्वी खडकवासला धरण क्षेत्रात मगर आढळून आली हाेती. त्यानंतर आता हे एक चार महिन्यांचे पिल्लू दिसले आहे. खानापूर परिसरातील बॅकवॉटरमध्ये मगरीचे प्रजनन होत असल्याने त्या ठिकाणी मगरींचे वास्तव्य आहे. परंतु, त्यांनी कधीही कोणावर हल्ला केलेला नाही. याविषयी ‘पीआरटी’ पथकाचे तानाजी भोसले, अक्षय जाधव, धवल तुडमवार व सूरज कवडे यांनी घटनास्थळी जाऊन त्या पिल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर व्यास संस्थेचे मनोज वाल्हेकर यांनीदेखील त्यांना मदत केली.
तानाजी भोसले यांचे वन्यजीव बचाव पथक हे गेली अनेक वर्षांपासून वन्यजीव संरक्षणासाठी काम करते. ते म्हणाले,‘‘मगरी एका वेळी पन्नासहून अधिक अंडी देतात, पण त्यातील सर्वच पिल्लं जगत नाहीत. त्यातील काही अंडी इतर वन्यजीव खातात किंवा काही फुटतात. जर ही पिल्लं मगरीजवळच राहिली तर ती जगतात. ती तर आईपासून दूर गेली, तर त्यांना मोठे मासे खाऊन टाकतात किंवा इतर जीव मारून टाकतात. ’’
—————————
हे चार महिन्यांचे पिल्लू बॅकवॉटरच्या बाहेर आलेले होते. त्यामुळे परत तिथेच सोडले असते तर ते वाचले नसते. म्हणून त्याला राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सोडले. काही महिने तिथे मोठे झाल्यावर त्याला पुन्हा निसर्गात सोडता येते.
- तानाजी भोसले, वन्यजीव संरक्षक
———————
खडकवासला धरणक्षेत्राच्या ज्या परिसरात मगरींचे वास्तव्य आहे, तिथे सूचनाफलक लावणे आवश्यक आहे. या मगरींचा कोणाला त्रास होत नसला तरी नागरिक त्या परिसरात जाऊ नयेत, म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.
- सुनील पिसाळ, वन्यजीव संरक्षक
----------------------