पुणे : पुणे शहरातून वाहणा-या मुठा नदीत मगर दिसून आली असून ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरू नये, असा सावधानतेचा इशारा नांदेड ग्रामपंचायतीने दिला आहे़ त्यामुळे नांदेड व शिवणे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वी कात्रज येथील तलावात काही वर्षापूर्वी मगर आढळली होती़ त्यानंतर वारसगाव धरणातही मगर आढळली होती. पण खडकवासला धरणाच्या पुढील भागात मगर आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे़ गेल्या काही दिवसापासून शहरात जोरदार पाऊस पडत असून त्यामुळे खडकवासला धरणाच्या पुढील भागातील ओढ्या नाल्याच्या पाण्यामुळे मुठा नदीतील पाण्यात वाढ झाली होती.
खडकवासला धरणाच्या पुढे पुणे शहराकडे नदीच्या पात्रात नांदेड गावाजवळ नदीवर पुल आहे़ हा पुल खाली असल्याने नदीच्या पाण्यात पाणी वाढले की हा पुल पाण्याखाली जातो. तरीही अनेकदा नागरिक, शाळकरी मुले या पुलावरुन थोडे पाणी वाहत असले तरी पुल पार करतात.
या पुलाच्या परिसरात मगर आढळल्याने नांदेड ग्रामपंचायतीने नोटीस काढली आहे. त्यात नांदेड व शिवणे ग्रामस्थांनी नांदेड शिवणे नदीवरील पुलाच्या जवळ मोठी मगर असल्याचे आढळून आली आहे. त्यामुळे कोणीही आपली मुले व गावातील मच्छीमार लोकांनी नदी पात्रात उतरु नये, असे नांदेड ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन देडगे यांनी सर्वांना कळविले आहे.
खडकवासला धरणातून यंदा अजूनही पाणी सोडलेले नाही. तरीही ही मगर आली कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.