बारामती : तालुक्यात रब्बी हंगामात मका, ज्वारी, गहू, हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र पाण्याअभावी जिरायती भागातील पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीचे प्रतिहेक्टरी उत्पादन ४०९ किलोपर्यंत घटले आहे. बारामती तालुक्यात रब्बी हंगामात सरासरीच्या ८२.४२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या होत्या. यामध्ये चारापिके आणि रब्बी ज्वारीखालील क्षेत्राचा अधिक समावेश होता. बारामती तालुका रब्बी तालुका म्हणून ओळखला जातो. रब्बीमध्ये प्रामुख्याने ज्वारीपिक घेतले जाते. त्याखालोखाल मका, गहू, हरभरा व चारापिकांच्या लागवडी शेतकरी करीत असतो. बारामती तालुक्याच्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता नीरा डाव्या कालव्यामुळे परिसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात प्रामुख्याने ऊस व फळबागांखालील क्षेत्र जास्त आहे. रब्बी हंगामात गव्हाची ५ हजार २२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. गव्हाचे प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादन २ हजार ४७० किलोपर्यंत गेले आहे. तालुक्याच्या जिरायती पट्ट्यांमध्ये तृणधान्य, कडधान्याचे पीक घेतले जाते. जिरायती पट्ट्यामध्ये ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली होती. मात्र पाण्याअभावी अनेक ठिकाणची ज्वारी सुकून गेली. पाणीटंचाईमुळे येथील शेतकऱ्याला ज्वारीचे बाटूकदेखील हाती लागले नाही. जिरायती ज्वारीचे उत्पादन प्रतिहेक्टरी ४०९ किलोपर्यंत घटले आहे. तालुक्याच्या बागायती पट्ट्यात ज्वारीचे उत्पादन प्रतिहेक्टरी १ हजार ४३७ किलो झाले आहे.यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरणीक्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र पेरणीक्षेत्र सरासरीपर्यंत पोहोचले नाही. तालुक्यात ४२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली होती. बारामती तालुक्यात मक्याची १ हजार ७१२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मकापिकाने पेरणीची सरासरी ओलांडली होती. चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड होत असल्याने पेरणीक्षेत्रात वाढ झाली. मकापिकाचे प्रतिहेक्टरी ३ हजार ९३९ किलो उत्पादन बारामती तालुक्यात झाले आहे. त्याबरोबरच ३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेल्या हरभऱ्याचे प्रतिहेक्टरी १ हजार २१७ किलो उत्पादन झाले आहे, अशी माहिती बारामती तालुका कृषी विभागाने दिली. (प्रतिनिधी)
पाणीटंचाईमुळे पिके गेली
By admin | Published: April 18, 2017 2:52 AM