बारामती : खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत १५ जुलै २०२१ असणार आहे. बारामती तालुक्यातील खरीप हंगाम २०२१ मध्ये बाजरी, भुईमूग, तूर, सोयाबीन व कांदा पिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.
पडवळ म्हणाले की, नैैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हेतू साध्य होण्यास मदत होईल आदी उद्दिष्टे या योजनेमध्ये ठेवण्यात आली आहेत.
अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी ही योजना असणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी योजना ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदाराचे व्यतिरीक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून, शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २.० टक्के रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधून गर्दी टाळण्यासाठी अंतिम दिनांकाची वाट न पाहता त्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरण्याची कार्यवाही करावी असे, आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.
------------------------
जोखीम बाबी :
- हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
- पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान.
- पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग,वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट.
- स्थानिक, नैसर्गिक आपत्ती याबाबीअंतर्गत पिकांचे होणारे नुकसान.
- नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान.
पीकनिहाय हेक्टरी विमा हप्ता दर
पीक शेतीकरी हिस्सा विमा रक्कम
बाजरी ४४० रुपये, २२ हजार रुपये
भुईमूग ७०० रुपये ३५ हजार रुपये
तूर ७०० रुपये, ३५ हजार रुपये.
सोयाबीन ९०० रुपये ४५ हजार रुपये
कांदा ३२५० रुपये ६५ हजार रुपये.
-----------------------------