पुणे : जिल्ह्यात शनिवारी व रविवारी झालेल्या अवकाळी पावऊ तसेच गारपिटीमुळे तब्बल ११ हजार २२७ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंब यासारख्या व्यापारी पिकांचा समावेश असून जिल्हा प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर कृषी विभागाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या अवकाळी पावसामुळे १९ हजार ७७३ शेतकऱ्यांना बसला असून एकूण उत्पादनाच्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात गेले दोन दिवस बहुतांश तालुक्यांमध्ये गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतामधील उभ्या पिकांना मोठा फटका बसला. भात, कांदा, ज्वारी, बटाटा, मका, भाजीपाला तसेच द्राक्ष, डाळिंब या पिकांनाही मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील अनेक फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत. सर्वाधिक नुकसान जुन्नर तालुक्यात सुमारे ४ हजार ८१७ हेक्टर इतके झाले असून तालुक्यातील सुमारे ४ हजार ८१७ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. त्याखालोखाल शिरूर तालुक्यात २ हजार ८२४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ६ हजार १३० शेतकरी बाधित झाले आहेत. आंबेगाव तालुक्यातही सुमारे २ हजार ६१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ६ हजार ४२८ शेतकऱ्यांची पिके हातची गेली आहेत.
याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे म्हणाले, “या पावसामुळे जिल्ह्यातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून आलेल्या निर्देशानुसार कृषी विभागाने पंचनामा करण्याचे काम हाती घेतले असून यात नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त गावांमध्ये नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याचा अहवाल लवकरच जिल्हाधिकारी कार्याला सादर करण्यात येईल.”
तालुका- गावे- क्षेत्र (हेक्टर)- शेतकरीभोर ७--१२.४५--४९
मुळशी १६--१२०.२--३१९मावळ ६७१--३६१.६--६७१
हवेली ८--३१९--३१९वेल्हा १९--४०.९--२१६
आंबेगाव ८१--२६१२--६४२८जुन्नर ८८--४८१७--४८१७
शिरूर १५--२८२४--६१३०खेड २७--१२०--८२४
एकूण ३१५--११२७--१९७७३