लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील पिकांची पाहणी आता मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे. टाटा ट्रस्ट यांनी यासाठी सरकारला विशेष मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करून दिले आहे.
पालघर तसेच सेलू व बारामतीचा काही परिसर या भागात या अॅप्लिकेशनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडे यासाठी स्मार्ट (अॅन्ड्रॉइड) मोबाईल असणे आवश्यक आहे. त्याला हे अॅप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे लागेल.
या अॅप्लिकेशनमध्ये महसूल विभागाचा डाटाही संकलित करण्यात आला आहे. त्यातून शेतकऱ्याला त्याची शेतजमीन सर्व्हे क्रमाकांसह मिळेल. त्यानंतर त्याने आपले शेतीक्षेत्र, पिकाचा प्रकार, किती जागेत त्याची लागवड केली, त्यातून होणाऱ्या त्या पिकाचे अपेक्षित उत्पादन, अशी माहिती अॅपवरील रकान्यांमध्ये लिहायची आहे.
एक शेतकरी त्याच्या एका मोबाईवर आसपासच्या किमान १५ खातेदारांच्या शेतजमिनींची व पिकांची माहिती लिहू शकतो. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याकडे मोबाईल नसला तरीही त्याच्याशेजारी त्याच्याकडच्या मोबाईल अॅपमध्ये नोंद करू शकतो.
या नोंदी थेट महसूल खात्याला मिळणार आहे. गाव, तालुका, जिल्हा, राज्य यांप्रमाणे सर्व नोंदी महसूल खात्याकडे जमा होतील.
या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण केले की गावाची, जिल्ह्याची, राज्याची समग्र माहिती एका क्लिकवर जमा ह़ोईल. ही माहिती संबंधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या सातबारा उताऱ्यावरही नोंदवली जाणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामापासूनच ही ई-पीक पाहणी सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून विविध माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे. गावांमधील मोबाईल वापरणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही याबाबत माहिती देण्याचा विचार कृषी विभागात सुरू आहे.
--//
पीक पाण्याच्या नियोजनासाठी, तसेच संपूर्ण देशाच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अशा पीक पाहणीचे अहवाल उपयुक्त असतात. गावस्तरावर तलाठीच हे काम करत असत. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आता यात अधिक अचूकता येणार आहे.
- प्रमोद सावंत, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी विभाग