राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने थैमान घातले असून, या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सततच्या पडणाऱ्या पावसाने तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागलेल्या या भागातील जनतेला आता ओल्या दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पावसामुळे येथील पिके जमीनदोस्त झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसाने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. काढणीला आलेली बाजरीची मळणी करताना शेतकरी मेटाकुटीला आलेले दिसत आहेत. त्यामुळे पुरे आता पाऊस, असे म्हणून पाऊस बंद होण्यासाठी शेतकरी देवाकडे विनवणी करू लागले आहेत. विविध ठिकाणच्या पाटबंधारे विभागाच्या वसाहतींतील पर्जन्यमापकांनुसार आज सकाळी नोंद झालेला पाऊस (कंसात या मोसमातील आजपर्यंतचा एकूण पाऊस) असा : दौंड ३ मिमी (३०३ मिमी), बोरीबेल ५६ (४३७), रावणगाव ६५ (४८६), भिगवण स्टेशन (राजेगाव परिसर) २७ मिमी (५२६ मिमी). पावसाचा जोर अजूनही कायम असून या परिसरातील ओढे-नाले खळाखळा वाहत असून, शेतातील काही सखल भागात चक्क पाण्याची तळी साचल्याचे चित्र वाटलूज, नायगाव, मलठण, राजेगाव या भागात पाहायला मिळत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कशीबशी जगवलेली पिके आज पाण्याखाली गेल्याचे विदारक चित्र दिसत आहे.वास्तविक पाहता, कोरडवाहू भागात घेतली जाणारी उडीद, तूर, मूग सोयाबीन ही पिके कमी पाण्यात व कमी दिवसांत समाधानकारक उत्पन्न मिळवून देतात म्हणून या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी घेतली होती. मात्र, पक्व होत आलेली ही पिके जादाच्या पावसाने सोडून द्यावी लागली आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)
पिके गेली पाण्यात
By admin | Published: October 11, 2016 2:03 AM